गवळी समाजाचे 18 तारखेला नागपूर हिवाळी अधिवेशनात एक दिवसीय धरणे आंदोलन.
मेळघाटच्या समस्यांवर राहणार फोकस.
सत्य दर्पण मेळघाट न्यूज. प्रवीण मुंडे. चिखलदरा.
गवळी समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य या समस्त गवळी समाजाच्या राज्यस्तरीय संघटनेच्या प्रमुख नेतृत्वात नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान संपूर्ण राज्यातील संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते 18 डिसेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनाद्वारे महाराष्ट्रातील समस्त गवळी समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी आवश्यक अशा प्रमुख मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सादर करणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. प्रमुख मागण्यांमध्ये मेळघाटातील गवलान, व गॉलवंश या उपजातींना केंद्राच्या ओबीसी यादीत घेणे भटक्या जमाती प्रवर्ग ब चे आरक्षण अडीच टक्क्यावरून पाच टक्के करणे. राज्यातील पशुपालकांच्या समस्या सोडविणे. क्रिमिलियर ची अट रद्द करणे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या हमीभावाला कायद्याचे संरक्षण देणे सर्व पद भरती मंजूर बिंदू नामावली नुसार करणे. वस्तीगृहातील प्रवेशात भ. ज. ब. प्रवर्गात यापुढे नवीन जातींना अटकाव करणे. आदींचा समावेश करण्यात आला असून या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गवळी समाज कृती समाज महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने करण्यात आले आहे.