Uncategorized

साधेपणानं लग्न ही काळाची गरज

विद्या सरपाते

सत्य दर्पण मेळघाट न्यूज प्रवीण मुंडे. मेळघाट

मुलीचा जन्म झाला की, तिच्या पित्याला काळजी असते ती तिच्या लग्नाची!अगदी बाळात्यात असल्यापासून तिला चांगला जोडीदार मिळाला पाहिजे,तिचा संसार सुखाचा झाला पाहिजे . तिच्या शिक्षणाचा , उज्वल भविष्यासाचा विचार त्याच्या डोक्यात अजिबात येत नाही.आणि तेव्हापासूनच तो पोट मारुन पैपै पदराला बांधून ठेवतो.
हळूहळू मुलगी मोठी होऊन लग्नाच्या उंबरठ्यात येऊन ठेपते,मग चालू होते वर संशोधन.! मुलीचा जोडा शोधता शोधता त्याच्या पायीचा जोडा पारं झिजून जातो.मनासारखं स्थळ मिळेपर्यंत सुखाची झोप घेत नाही.मुलगी जर रंगानं काळी, सुस्वरूप नसेल तर तिला अनेक नकार पचवावे लागतात.लग्न जमवणे आणि बाजारात बैल घेणे सारखंच असते.बैल कामाला चांगला नसला तरी चालेल पण दिसायला रुबाबदार आणि देखणा असावा लागतो.एकवेळ मारका असला तरी चालेल पण दिसायला चांगलाच हवा!त्याचे दात,शिंगं,खुर हे सारं काही बघून बैल खरेदी केला जातो.दलालाशिवाय बैल विकल्या आणि घेतल्या जाऊ शकत नाही.आजकाल लग्नासाठी मुलगी मिळणं फार अवघड होऊन बसलंय म्हणून अशा दलालांचा सुळसुळाट झालाय.काहींचा तर हा धंदा होऊन बसलाय.मुलीला कोणी पसंत करत नाही म्हणून मुलीचे वडील वैतागलेले असतात.ते अशा दलालांना बळी पडतात.कधीकधी मुलगा विधुर, घटस्फोटीत असतो.मुलांचा पिताही असतो.दोनदोन बायकाही असतात.गुन्हेगारी प्रवृत्तीचाही असतो.कधीकधी तर लग्नाच्या नावाखाली मुली विकण्याचा त्याचा धंदाही असतो.बऱ्याचदा वधू पित्याची फसवणूक होते.त्याच्यापासून या गोष्टी लपवल्या जातात.नोकरी, संपत्तीची खोटी माहिती देऊन लग्न जमवले जातात.
कायद्यानं हुंडा बंदी असली तरी ही प्रथा काही बंद झालेली नाही.नोकरी करणाऱ्या नवरदेवाचे भाव तर गगनाला भिडलेले आहेत.मुलगी कितीही सुंदर,सुशिल,शिकलेली, आणि पदाधिकारी असली तरी काही महाभाग लग्नाआधी तुम्ही तिची कमाई खाल्ली असेल म्हणून हुंडा घेतात तर मुलाच्या शिक्षणाला खूप खर्च आला म्हणून मुलांचे आईवडील हुंडा मागतात.
नवरदेव जर शेतकरी असेल तर त्याचे भाव एकरावर आणि जिरायती, बागायती यांवरुन ठरतात.एकटा असेल तर जरा महाग असतो.बऱ्याचदा ‘जोड्याला जोडा’ नसला तरी केवळ संपत्ती पाहून लग्न जुळवले जातात.उपवर, घटस्फोटीत,विधुर मुलाला अल्पवयीन मुलगी दिली जाते.नंतर अशी लग्न टिकतातंच असे नाही.
एकदा का लग्न जमलं की दहा पाहुणे मुलाचं घर बघायला जातात.नंतर मुलाकडचे वीस पाहुणे मुलीच घर बघायला येतात.मग एवढ्या लोकांचा जेवणाचा खर्च…त्यानंतर होतो साखरपुडा!
आणि सोबत महिला असतील तर त्यांच्या साड्यांचा खर्च तो वेगळाच!
मुलीचे वडील मुलीच्या लग्नासाठी पैपै जोडून ठेवतात.हुंड्यासाठी कर्ज काढतात आणि उदरनिर्वाहासाठी असलेलं एकर,दोन एकर विकून भूमिहीन होतात.एवढं करून लेकीच लग्नानंतर चांगलंच होईल याची शाश्वती नसते.साखरपुड्याच्या दिवशी शिदोरी देण्याची पद्धत असते.पूर्वी फक्त पाच दुरड्या भरून शिदोरी देत असत.आता शंभर मोठमोठाले डबे भरून शिदोरी दिली जाते जिला कोणी खात नाही.बरं फक्त शिदोरी वरच भागत नाही तर जेवढ्या विहीणी असतील तेवढ्यांना भेटवस्तू ही द्यावीचं लागते.तिखट, चटण्या,तुपाच्या बरण्या, मेकअप च सामान,काजू,बदाम.बापरे!बाप!ही काय प्रथा आहे.अहो! गरिबांना कीती त्रास होतो याचा!लग्न पद्धतीत कमी होण्याऐवजी एक एक रिवाज वाढतंच चाललाय.आजकाल लग्नात पद्धती या कमी होण्यापेक्षा वाढतंच चालल्यात ज्याचा फटका गरिबांना बसतो.एका लग्नाचा खर्च फेडण्यासाठी वधू पित्याला कितीतरी वर्ष कष्ट सोसावे लागतात.कर्ज फेडता फेडता त्याच्या नाकी नऊ येतात.साखरपुडा किंवा सोयरिक पक्की झाली की,नवऱ्या मुलीला भ्रमणध्वनी नवऱ्या मुलांकडून दिला जातो.बऱ्याचदा यामुळं लग्न मोडतात.बर मुलीच्या अंगावर लग्नात जे दागिने घातले जातात ते दिलेल्या हुंड्यातून.
नंतर दिवस येतो तो बस्ता बांधण्याचा! यांचे दहा माणसं त्यांचे दहा माणसं बसतात एका मोठ्या दुकानात! मुलीकडे बस्ता असल्यास नवऱ्यामुलाकडचे, लग्न एकदाच होते म्हणून महागडे कपडे घेतो.बरं किंमती नुसार कपड्यांचा दर्जा नसतो.फक्त दुकानदाराचा फायदा.नवऱ्यामुलीच्याही साड्या फार महाग! लग्नानंतर फक्त कपाटातंच पडून असतात.दोन्हीकडचे लोकं फक्त ‘याला गाड त्याला गाड’ हेच धोरण राबवत असतात.
लग्न म्हटलं की, स्त्रीया कमालीच्या उत्साही असतात.त्यांच्यामागे कामं आणि जबाबदाऱ्याही तेवढ्याच असतात.डोळ्यासमोर फक्त एकच उद्दिष्ट असते ते म्हणजे लेकीच्या लग्नात काही कमी पडू नये आणि ते निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे.
ग्रामीण भागातील लग्न म्हटलं की, प्रामुख्याने जपावी लागते ती भाऊबंदकी! स्त्री म्हटलं की, मानपान रुसवा-फुगवा हा आलाच!भावकीतील मोठ्या स्त्रीच्या खांद्यावर दळण,हळद ,रुखवत बनवणे यांसारख्या तत्सम कामांसाठी समाजातील स्त्रियांना बोलावण्याची जबाबदारी टाकलेली असते.ग्रामिण भागात अजूनही दळण निवडणे,हळदीचे घाणे घालणे, लग्नासाठी पापड, कुरडया, शिदोरी,रुखवत बनवणे ही कामं समाजातील स्त्रियां मोठ्या आनंदाने करतात.ही कामं करताना सर्व रुढी, परंपरेच तंतोतंत पालन केले जाते.विधवा स्त्रियांना तर हळदीच्या जाण्याला देखील हात लावू दिला जात नाही मग ती वधूची आई असली तरी.आणि आपल्या वाट्याला वैधव्यामुळे ज्या वेदना आल्या,जे भोग भोगले ते लेकीच्या वाट्याला येवून नये म्हणून विधवा स्त्रियांही लांबच राहतात इच्छा असूनसुद्धा!विधुरांना मात्र हे नियम लागू नाहीत.
सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो तो हळदीचा.या एक दोन वर्षांत हळदीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा रूढ झाली आहे.रुढी, परंपरा कशा रुढ होतात त्या या अशा !आजकाल डिजेशिवाय तर हळद अपूर्णच! स्त्री-पुरुष दोघेही नाचून आनंद लुटत असतात.बरेच पुरुष मद्यधुंद असतात.नाचगाण्यात डिजेच्या तालावर ते एवढे तल्लीन झालेले असतात की त्यांना डिजेचा आवाज आणि वेळेचं ही भान नसते.
त्याचा त्रास लहान मुलं,आजारी माणसं, विद्यार्थी यांना होत असेल यांचाही विचार करत नाहीत.डिजेच्या आवाजानं शेजारच्या घरातील भांडे पडतात.खिडक्यांच्या काचा फुटतात.भिंतीना तडे जातात.याचं कोणतंच भान त्यांना नसते आणि ते ऐकण्याच्या मनःस्थितीतीतही नसतात.ग्रामिण भागातील लोक समजून घेतात.तक्रार करत नाहीत.लग्नात वाद नको म्हणून….
नंतर उजाडतो तो लग्नाचा दिवस.या दिवसांपासून दोघांच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार असते.अत्यंत धावपळीचा आणि गोंधळाचा दिवस.लग्नपत्रिकेत लग्नाची वेळ दोनची असते आणि वऱ्हाड तिनला येतं.आल्यानंतर बराच वेळ पारंपरिक पद्धती पार पाडण्यात जातो.मग निघते ती वरात.नवरदेव शेवंती साठी जातो.त्याची शेवंती आटोपेपर्यंत इकडे पंगती बसतात.सुरवातीला पाहुणे जेऊ घालण्याची पद्धत आहे.पंगत म्हटलं की, आग्रह हा आलाच!नवरीचा बाप किती कष्टानं लोकं जेवू घालण्यासाठी अन्नधान्य जमवत असतो.स्वत: अर्धपोटी राहून लेकीच्या लग्नासाठी पैसे साठवत असतो याची कल्पना कदाचित वाढणाराला आणि खाणाराला नसते.किती अन्न पात्रावर उरलेलं असतं जे उकिरड्यावर टाकलं जातं.त्याला ढोरं आणि कुत्रे देखील कंटाळतात.किती नासाडी होते अन्नाची.अन्न पायंदळीही तुडवल्या जाते.त्यासाठी किती कष्ट उपसले ले असतात!लग्नात जेवणासाठी ज्या पत्रावळ्या,द्रोण, प्लास्टिकचे ग्लास वापरले जातात ते नंतर रस्त्यावर टाकले जातात.त्याची योग्य ती विल्हेवाट लावली जात नाही.त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आणि प्रदुषणही.
लग्न म्हटलं की आंदण आणि आहेर हा आलाच!आहेर आणि आंदण म्हणून जे कपडे आणि भांडी दिली जातात ती खरंच काही उपयोगाची असतात? लग्नातलं आंदण हे घरी आल्यावर पोत्यात भरून ठेवलं जातं.कधी वापरतील ते एवढे भांडे.घरात ठेवायला जागा देखील नसते.काही दिवसांत ती भांडी न वापरताचं चिरतात ज्याला भंगार वाला देखील घेत नाही.जर तुम्हाला लग्नात भेटवस्तू द्यायचीच असेल तर समजा दोनशे ची भेटवस्तू असेल तर त्याऐवजी पन्नास रुपयांचाच आहेर करा जेणेकरून त्याचा उपयोग होईल.आंदण भांडे म्हणजे ‘धनी टाकेना आणि चोर नेईना’.
लग्न म्हटलं की,वरात आलीच आणि वरात म्हटली की बॅंडबाजा, नाचगाणी ही ओघाने आलीच! त्यामागे एक उद्देश असतो तो म्हणजे नवरदेव मिरवूण आणे पर्यंत जेवणाचा कार्यक्रम आरामशीर आटोपते.आजकाल लग्न दारु आणि डिजेशिवाय पारंच पडत नाहीत.नवरदेवाकडील मंडळी मद्यधुंद अवस्थेत नाचत असते.भटजींना भरमसाठ दक्षिणा देऊन जो मुहूर्त काढला जातो,तो ही टळून गेलेला असतो.बऱ्याचदा गाणं वाजवण्यावरुन वाद उद्भवतात आणि मग वऱ्हाडीच एकमेकांना वाजवतात.बरीच मंडळी लग्न कधी लागते याची वाट पाहून पाहून वधूवरांच्या डोईवर अक्षता न टाकताच निघून जातात.अनेक ठिकाणी उन्हात नाचल्यामुळे नवरदेव मृत्यू मुखी पडल्याच्या घटना घडतात.लग्न जेव्हा वऱ्हाडी मंडळी नाचून थकेल तेव्हा फार उशीरानं लागते.तोच त्यांचा मुहूर्त!नाचण्यापुढे त्यांना बिघडलेल्या वातावरणाचंही भान राहातं नाही.
हल्ली तर गणपती, लग्न,देवी, मिरवणूका या दारु पिऊन नाचल्याशिवाय साजऱ्याच होत नाहीत.काही दिवसांनी लोक मढ्याच्या मागेदेखील नाचत नाचत स्मशानात जातील की काय अशी भिती आता वाटायला लागलीय.
जसजशी प्रगती होत जाते.पैसा वाढत जातो तसतसे चोचले , हौसमौज, पद्धती वाढत जातात.सध्या वाढती महागाई, दुष्काळ ,नापिकी लक्षात घेता निदान शेतकऱ्यांनी तरी साध्या पद्धतीने कमी खर्चात लग्न करणे ही काळाची गरज आहे.
कोरोनाकाळात घरात आणि अगदी मोजक्याच लोकांत लग्न पारं पडलीतंच ना!हे कुठं तरी थांबलं पाहिजे.यात तरुणांनीच पुढाकार घेतला पाहिजे या सगळ्या आधुनिक चालीरीतींना फाटा देत,लग्न हे साध्या पद्धतीने,वेळेत आणि कमी खर्चात केली पाहिजत आणि ती काळाची गरज आहे.शेतकरी आत्महत्या करतो त्याच हे देखील एक कारण असू शकते.

ते सरपा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button